परभणी जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, गंगाखेड व परभणी या चार आगारांमधून सद्य;स्थितीत ८०० नियमित बसफेऱ्या होत आहेत. त्यातून जवळपास १९ लाख रुपयांचे उत्पन्न एस.टी. महामंडळाला मिळत आहे. एकीकडे निर्बंधांमध्ये सूट मिळाल्याने एस.टी. महामंडळाची प्रवासी वाहतूकही पूर्ववत होत आहे; तर दुसरीकडे रातराणी व लांब पल्ल्याच्या एस.टी. बसना प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे रविवारी दिसून आले. परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयअंतर्गत येणाऱ्या चार आगारांपैकी केवळ परभणी आगारातून रातराणी सेवेसाठी फक्त तीन बसेस सोडण्यात आल्या आहेत. उर्वरित पाथरी, गंगाखेड व जिंतूर या तीन आगारांतून अद्याप रातराणी एस.टी. बसना प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने जिल्हा ऑनलॉक झाल्यानंतरही या बससेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्सना पुणे, औरंगाबाद, मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचे रविवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले.
केवळ पुणे मार्गावर गर्दी
कोरोना विषाणूच्या कडक निर्बंधांतून सूट मिळाल्यानंतर परभणी आगाराने रातराणी व लांब पल्ल्याचा प्रवासासाठी परभणी-पुणे ही बससेवा सुरू केली आहे. या बससेवेच्या तीन फेऱ्या नियमित केल्या जातात. एकीकडे रातराणी बसला इतर आगारांत प्रवासी मिळत नाहीत; तर दुसरीकडे पुणे-परभणी या मार्गावर या बससेवेला प्रवासी गर्दी करीत असल्याचे एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.