परभणी : जिल्ह्यातील धर्मापुरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे शिक्षणात खंड पडण्याच्या भीतीने तो तणावात होता. यातूनच नैराश्य आल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. शुभम गंगाधर उगले (२०) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
धर्मापुरी या छोट्याशा गावातील शुभम गंगाधर उगले हा परभणी येथील रघुनाथ महाविद्यालयातील बी. ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने महाविद्यालये सुरू झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा संसर्ग वाढत चालल्याने पुन्हा दि. १ ते ४ मार्च या कालावधीत महाविद्यालये बंद होती. दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रकही आले होते. नुकत्याच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या. शुभमची परीक्षा २३ मार्चपासून सुरू होणार असल्याने व लाॉकडाऊनमध्ये पुरेसा अभ्यास न झाल्याने तो निराश होता, कोणाशी फारसे बोलत नव्हता, असे त्याचे काका धाराजी नारायणराव उगले यांनी सांगितल्याचे सूत्रांकडून कळते.तो सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास स्वयंपाक खोलीत एकटाच होता. तिथेच त्याने साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला. या प्रकरणी काका धाराजी नारायणराव उगले यांनी दिलेल्या माहितीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.