परभणी: मुख्याध्यापकासह शिक्षकाची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, या मागणीसाठी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांनी सोमवारी जिल्हा कचेरीत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापन समितीने अनेक वेळा प्रशासनास निवेदने दिली. मात्र ही पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर रिक्त मुख्याध्यापकाचे व शिक्षकाचे पद तत्काळ भरण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पायऱ्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाने हे निवेदन स्वीकारून रिक्त पदे भरण्यात येतील असे आश्वासन विद्यार्थी व ग्रामस्थांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे सोमवारी प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले. यावेळी संतोष देशमुख, दिपक देशमुख, बाळासाहेब देशमुख, शेख सलमान, आशिष हारकळ,शरद नंद, गोपाळ देशमुख आदींची उपस्थिती होती.
या केल्या मागण्या....पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक, विज्ञान विषयाच्या शिक्षकाचे पद तत्काळ भरावे, नवीन इमारतीचे काम मागील दोन वर्षापासून बंद आहे. या कामाची चौकशी करावी, शाळेमध्ये दर्जेदार शौचालयाची उभारणी करावी, शालेय गणवेशाचे वाटप तत्काळ करावे, शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी करण्यात आल्या.