गंगाखेड (परभणी ) : अवजड वाहनांच्या रहदारीमुळे तालुक्यातील खळी पाटी येथुन खळी, गौंडगाव, मैराळसावंगी, धारासुरकडे जाणारे रस्ते खराब झाली आहेत. यामुळे या मार्गावरील बस वाहतुक बंद पडली आहे. यावर गांधीगिरी करत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आज सकाळी वाळू वाहतूक चालकांचे स्वागत करत त्यांना या मार्गावरील वाहतूक बंद करण्याची विनंती केली.
खळी, गौंडगाव, मैराळसावंगी, धारासुरकडे जाणारी रस्ते वाळू वाहतुकीच्या अवजड वाहनांमुळे खराब झाली आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने या रस्त्याने धावणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. याचा त्रास विद्यार्थी व ग्रामस्थांना होत आहे. यामुळे त्यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी करत रस्ता रोको आंदोलन केले, तसेच तहसीलदारांच्या दालनात शाळा भरवली.अशा प्रकारची वेगवेगळी आंदोलने करून हि त्यांच्या पदरी उपेक्षाच पडली. यामुळे आज विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी गांधीगिरी करत या मार्गावरील वाळू वाहतूक करणारी वाहने थांबवत चालकांना टॉवेल, टोपी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना या ह रस्ता खराब होऊ देऊ नका अशी विनंती केली.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे ओंकार पवार, बालासाहेब विनायकराव सोन्नर, रमेशराव पवार, बालासाहेब सोन्नर, ग्राम पंचायत सदस्य शेषराव सुरवसे, विजय सोन्नर, माऊली घुलेश्वर, बाळासाहेब सुरवसे, अनिल सावळे, बाळु सावळे, ज्योतीका विठ्ठल बाळसकर, शुभांगी ज्ञानदेव सोन्नर, सागर सर्जेराव सावळे, योगेश रुस्तुम सोन्नर आदी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.