शासनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजनेंतर्गत शिष्यवृती जाहीर केली आहे. मात्र, कौसडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीचे विद्यार्थी मुख्याध्यापकाच्या हलगर्जीपणामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. याबाबत पालकांनी गटशिक्षणाधिकारी सुभाष आम्ले यांची भेट घेऊन तक्रार केली. मात्र, कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षणधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तीन वर्षांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी बालासाहेब लक्ष्मण शिंदे, माधव विठ्ठलराव खरात, मुंजाजी किसनराव शिंदे, माधव शंकरराव खरात, दत्ता काळे यांनी केली आहे.
प्रस्ताव गायब?
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव मुख्याध्यापकांकडे दाखल केले होते. तीन वर्षांपासून शिष्यवृती मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांनी दाखल केलेल्या प्रस्तावांची मागणी केली. मात्र, हे प्रस्ताव पालकांना दाखविण्यात आले नाहीत. त्यामुळे शाळेतून विद्यार्थ्यांचे प्रस्ताव गायब झाले की काय, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.