परभणी : शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक आज थेट जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात दाखल झाले. शिक्षक द्या आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा, अशी मागणी विद्यार्थी- पालकांनी सीईओंकडे केली.
पाथरी तालुक्यातील कासापुरी येथे जिल्हा परिषदेची सातवी पर्यंतची शाळा आहे. या शाळेत २५० विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांचे ९ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात केवळ तीन शिक्षकांवर मागील वर्षभरापासून शाळा चालविली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चालू शैक्षणिक सत्रात शाळेला शिक्षक मिळतील, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती; परंतु, ती फोल ठरली. त्यामुळे २१ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विद्यार्थी, पालक कासापुरीहून थेट परभणीत दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातच ठाण मांडून शिक्षकांची मागणी केली. यावेळी रंगनाथ वाकणकर, पं.स.सदस्य शरद कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे, गीताराम गरुड, अरुण कोल्हे, सुभाष वाघमारे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण जिल्ह्यातच प्रश्नशिक्षकांची मागणी करण्यासाठी आलेल्या पालकांना उत्तर देताना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज म्हणाले, शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न जिल्ह्यातील सर्वच जि.प.शाळांमध्ये आहे. जिल्हा परिषदेकडे केवळ ५० टक्के शिक्षक उपलब्ध आहेत. शाळेसाठी तात्पुरती व्यवस्था करु, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी थेट दालनात आणल्याने सीईओं पृथ्वीराज यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांची शाळा बुडवून अशा प्रकारे पाठपुरावा करणे योग्य नाही. शिक्षकांच्या प्रश्नांवर तुम्ही अर्ध्या रात्री माझ्याशी संपर्क साधा; परंतु, विद्यार्थ्यांना आणून त्यांची गैरसोय करु नका. शिक्षकांच्या रिक्त प्रश्नांविषयी सकारात्मक तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले.