येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात सोमवारी इयत्ता ९ वीतील विद्यार्थ्यांचे उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एल. एम. सुभेदार, माजी मुख्याध्यापक डी. एम. नागरे, मुख्याध्यापक पी. एस. कौसडीकर, सुभाष नावकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. हरबडे म्हणाले की, सध्या प्रवासात किंवा शहरात वावरताना नागरिक मास्क किंवा इतर सूचनांचे पालन करताना दिसत नाहीत; परंतु कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत येताना हात स्वच्छ धुऊन येणे गरजेचे आहे तसेच मास्क वापरणे, गर्दी टाळणे आदी दक्षता देखील घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. शाळेला हारांचे तोरण, कार्यालय व परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच कोरोनाबाबत काळजी घेण्याचे फलक देखील परिसरात लावण्यात आले आहेत. सोमवारी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने व अनेक महिन्यांनंतर शाळा सुरू होत असल्याने शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
लस येईपर्यंत विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:17 AM