देवगांवफाटा : बससेवेचे वेळापत्रक कोलमडल्याने झालेली गैररसोय आणि मानव विकासची बससेवा नियमित सुरू होत नसल्याने, संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास राजवाडी येथे दोन तास बस रोखून धरत आंदोलन केले.
लग्गसराईच्या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सेलू बस स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. मात्र, सेलू येथुन वालूर, आष्टी, सातोना, परतूर, डासाळा या मार्गावरील बससेवेचे वेळापत्रकात कोलमडून गेले. या मार्गावर बस वेळेत धावत नसल्याने, बस स्थानकात गर्दी वाढत होती. याशिवाय उपलब्ध बसमध्येही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रवाशांना खाली उतरून बसला धक्का मारावा लागला. हा प्रकार प्रवाशांसाठी मनस्ताप देणारा ठरला. ८ दिवसांपासून परिवहन अधिकारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी भाजपचे खाजा बेग यांनी वाहतूक नियंत्रकास धारेवर धरले, पण बस वाहतुकीचे नियोजन हे पाथरी आगारातून असल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यातच वालूर येथून सेलूकडे धावणारी बस सकाळी ८:३० वा. राजवाडी येथे आली, पण यामध्ये आगोदरच प्रवाशी संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही बस रोखून धरली, जोपर्यंत दुसरी बस येऊन आम्हाला घेऊन जात नाही, तोपर्यंत बस येथून हालू देणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी सेलू येथून पाठवलेली स्वातंत्र बस राजवाडी येथे १०:३० आली आणि त्यानंतर, हे विद्यार्थी बसमध्ये बसून या दोन्ही बस सेलूकडे रवाना झाल्या.
मानव विकास बससेवा दुर्लक्षित
पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा नियमितपणे सुरू झाल्या असल्या, तरी सेलू तालुक्यात लाडनांदरा, राव्हा, हिस्सी या मार्गावरील मानव विकास सेवा अद्यापही सुरू नाही. हा गंभीर प्रकार आहे. केवळ देवगावफाटा व कुपटा मार्गावरील मानव विकास बससेवा सुरू आहेत. त्यामुळे मानव विकासच्या सर्व बससेवा नियमितपणे सुरू होणे गरजेचे आहे.
सेलू तालुक्यातील वालूर येथे बसमध्ये जागा नसल्याने राजवाडी येथील विद्यार्थ्यांनी रोखून धरलेली बस.
सेलू बस स्थानकातून आष्टी मार्गावर धावणारी बस बंद पडल्याने धक्का देऊन बस सुरू करताना प्रवासी.