परभणी : जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे आणि त्यांचे पौराणिक महत्त्व भावी पिढीला व जिल्ह्याबाहेरील नागरिकांना उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक स्थळांच्या माहितीचे संकलन सुरू झाले असून, आतापर्यंत अभ्यास गटातील तज्ज्ञांनी ३६ स्थळांना भेटी देऊन माहिती संकलित केली आहे.
जिल्ह्यात गावा-गावांत पौराणिक मंदिरे, पुरातन वास्तू, शिल्प आदी ऐतिहासिक वारसा उपलब्ध आहे. मात्र, या मंदिर आणि शिल्पांची शास्त्रशुद्ध माहिती नागरिकांसमोर एकत्रितरीत्या उपलब्ध नाही. जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व इतरांना पटवून देण्यासाठी आणि हा वारसा जतन करीत त्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी महिनाभरापूर्वी इतिहासतज्ज्ञांची बैठक घेऊन या प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर एका अभ्यास गटाची नियुक्तीही या कामी करण्यात आली. चारठाणा येथील हेमाडपंथी मंदिरे, धारासूर येथील गुप्तेश्वराचे मंदिर, शेळगाव येथील महाविष्णूचे मंदिर यासह अनेक पौराणिक स्थळांना अभ्यासगटातील सदस्य भेटी देत आहेत. सुरुवातीला एकूण ४४ पौराणिक स्थळे निवडण्यात आली असून, त्यातील ३६ स्थळांची माहिती संकलित करण्यात आली आहे. गटातील सदस्य गावात पोहोचल्यानंतर ग्रामस्थांना या पौराणिक स्थळांसंदर्भात एक प्रश्नावली देतात. त्यात स्थळांची माहिती संकलित केली जाते. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांकडून आख्यायिका, स्थळांचे महात्म्ये संकलित केले जाते. पहिल्या टप्प्यात ही माहिती पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर आवश्यकता भासल्यास दुसऱ्यांदा भेट देऊन आणखी पूरक माहिती संकलित केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये संकलित केलेल्या माहितीचे लिखाण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक छायाचित्रकारांकडून या स्थळांचे छायाचित्र मिळविले जाणार आहेत. तसेच व्हिडिओ चित्रीकरणही केले जाणार आहे. परभणी हेरिटेज नावाचे पुस्तक या प्रकल्पातून प्रकाशित केले जाणार असून, स्वतंत्र संकेतस्थळही निर्माण करण्यात येणार आहे.
सहा ग्रंथांचे डिजिटलायझेशन
नागरिकांकडे उपलब्ध असलेले पौराणिक व दुर्मिळ ग्रंथ प्रशासनाला उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले होते. त्यानुसार सहा ग्रंथ प्रशासनाला प्राप्त झाले असून, त्याचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. जुन्या ग्रंथांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.