पाथरी ( परभणी ) : येथील रेणुका शुगर्स साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात यावी , कारखाना परिसरातील व पाथरी उपविभागातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याची हमी द्यावी या व इतर अठरा मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभा यांच्या नेतृत्वात आज दुपारी पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात अडीच तास रास्ता रोकोआंदोलन करण्यात आले आंदोलना यावेळी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक खोळंबली .
ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेच्या वतीने पाथरी शहरातील सेलु कॉर्नर येथे गुरुवार 30 डिसेंबर रोजी तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .प्रारंभी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर शेतकऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली .हा मोर्चा घोषणाबाजी करत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सेलु कॉर्नर येथेत आला होता .याठिकाणी शेतकऱ्यांनी अडीच तास ठिय्या करत वाहतूक अडवून धरली होती.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कॉम्रेड राजन शिरसागर ,कॉम्रेड शिवाजी कदम ,कॉम्रेड विजयसिंह कोल्हे ,ज्येष्ठ शेतकरी नेते विश्वनाथ थोरे ,कॉम्रेड नवनाथ कोल्हे आदींनी मार्गदर्शन केले .दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांना ठोस आश्वासन दिल्याशिवाय या ठिकाणावरून न उठण्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली होती. या ठिकाणी सुरु असलेले आंदोलन थांबविण्यात यावे यासाठी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण मध्यस्थी करत होते. दरम्यान, सहकार आयुक्त, अपर जिल्हाधिकारी यांनी साखर आयुक्त यांच्या मार्फत मंत्रालयात श्री रेणुका शुगर साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवणे संदर्भात प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्या संदर्भात आश्वासन दिल्यानंतर कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका घेतली .यावेळी नायब तहसीलदार एस .बी . कट्टे यांच्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सहकार मंत्री , साखर आयुक्त व परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले ..आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती .आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु, अठरा मागण्या मार्गी न लागल्यास पुढील आंदोलन हे जेलभरो आंदोलन असेल.- कॉम्रेड राजन क्षीरसागर