शहरी भागात रस्त्याचे काम
परभणी : गंगाखेड रस्त्याच्या कामाने गती घेतली असून, आता उड्डाणपुलापासून ते पिंगळगड नाल्यापर्यंतचा रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी या रस्त्यावर खोदकाम केले जात आहे. सध्या गंगाखेड नाक्यापासून पुढे या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
सिंगणापूर भागात रस्त्याचे काम रखडले
परभणी : गंगाखेड रोड ते पूर्णा मार्गे नांदेड या रस्त्याचे काम बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून सिगंणापूर ते गंगाखेड रोड या साधारणत: ३ कि.मी. अंतराचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. गंगाखेड रस्त्याने नांदेडकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा झाला आहे. रखडलेले तीन कि.मी. अंतराचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
वसुलीसाठी खंडित केली जातेय वीज
परभणी : महाविरतण कंपनीने जिल्ह्यात वसुली मोहीम सुरू केली आहे. ज्या ग्राहकांनी वीज बिल अदा केले नाही, त्याचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. ग्रामीण भागात वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असल्यास संपूर्ण गावाचाच वीज पुरवठा बंद ठेवला जात आहे. त्यामुळे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही महावितरण वेठीस धरत आहे.
अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळे
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात मोठ्या प्रमाणात अस्थायी अतिक्रमणे वाढली आहेत. स्टेशन रोड, निरज हॉटेल ते अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा या भागात हे प्रमाण अधिक आहे. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक रहात नसून, किरकोळ अपघातही होत आहेत. महापालिकेने हे अतिक्रमणे काढून घ्यावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.