पाथरी - जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेल्या पहिल्या पाणी पाळीत ६ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ३ हजार हेक्टरवरील ऊस पिकाला पाणी मिळाले. २७ नोव्हेंबरपासून सोडण्यात आलेले पहिले आवर्तन १४ डिसेंबर रोजी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
पैठण येथील जायकवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी तीन पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पहिल्या आवर्तनाचे पाणी २७ नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्यात दाखल झाले होते. पाथरी जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. ६ अंतर्गत वितरीका क्र. ४७ ते ६३ मध्ये रब्बी हंगामातील पिकांना पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. या पाण्याच्या माध्यमातून पाथरी आणि मानवत तालुक्यातील जवळपास ६ हजार हेक्टर शेती सिंचन करण्यात आले आहे. यावर्षी रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिकांना जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यास अधिक भर दिला आहे. एकूण झालेल्या सिंचन क्षेत्रापैकी ५० टक्के म्हणजेच ३ हजार हेक्टरवरील ऊस पिकाला फायदा झाला आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरबरा आणि उभ्या तुरीच्या पिकाला जायकवाडीच्या पाण्याचा लाभ झाला आहे.
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेले पहिले आवर्तन बंद करण्यात आले आहे. आता दुसरे आवर्तन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात येणार आहे.
-डी. बी. खारकर, उपअभियंता, जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. ६ पाथरी