पाथरी - दोन दिवसांपासून वह्या आणण्यासाठी घरातून मोपेडवर बाहेर पडलेली तरुणी बेपत्ता होती. गुरुवारी ( दि. 18 ) सकाळी 9 वाजेच्या सुमारास तिचा गोदावरी पात्रातील ढालेगाव बंधाऱ्याच्या परिसरात मृतदेह आढळून आला आहे. संपदा घुले ( २०) असे मृत तरुणीचे नाव असून परीक्षेत चांगले गुण मिळत नसल्याने नैराश्यातून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती आहे.
पाथरी शहरातील शाहू नगर येथील सुभाष घुले यांची मुलगी संपदा 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वह्या आणण्यासाठी म्हणून घरून मोपेड घेऊन गेली होती. बराच वेळ झाल्यानंतरही ती घरी परतली नाही. तसेच तिचा मोबाईल फोनवर संपर्क होत नसल्याने वडिलांनी शोधशोध सुरू केली. काही वेळाने ढालेगावच्या पुलाजवळ संपदाची मोपेड, चपल आणि स्कार्फ आढळून आला. मात्र, मुलगी आढळून आली नाही. यामुळे पाथरी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गोदावरी पात्रात दोन दिवस शोध घेतला. गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह गोदावरी पात्रात तरंगताना आढळून आला. या प्रकरणी मुलीचे काका गोविंद घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची पाथरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
परीक्षेत चांगले गुण मिळत नसल्याने होती नैराश्यात बारावीनंतरच्या सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळत नसल्याने संपदा नैराश्यात होती. यातूनच तिने आत्महत्या केली. मुलीच्या काकाने दिलेल्या फिर्यादीत हा उल्लेख करण्यात आला आहे.