मातृवंदना योजनेत ९०० महिलांना लाभ
मानवत : तालुक्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षात ८५० पात्र महिलांना लाभ देण्यात आला. या योजनेत जवळपास एकूण १३ लाख ५९ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. दरम्यान, या योजनेत ३ टप्प्यात एकूण ५ हजार रुपयांचे गरोदर मातांना अनुदान दिले जाते.
पदनिर्मितीचा प्रस्ताव रखडला
परभणी : जिल्ह्यासाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची मंजुरी मिळाली असून, या रुग्णालयात नवीन पदाच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, तो दीड वर्षापासून रखडला आहे. त्यामुळे मंजूर आराखड्यातील नवीन पद निर्मितीचा प्रस्ताव तत्काळ निकाली काढावा, अशी मागणी परभणीकरांतून होत आहे.
पिंगळी-परळगव्हाण रस्त्याची दुरवस्था
परभणी : तालुक्यातील पिंगळी ते परळगव्हाण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून,रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे.पिंगळी ते परळगव्हाण हा ५ किमीचा रस्ता आहे. मागील ५ वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
रेशन दुकानातून तूर डाळ मिळेना
परभणी: मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात रेशन दुकानांवरून तूर डाळ वाटप होत नसल्याच्या तक्रारी लाभार्थी करीत आहेत; मात्र याकडे जिल्हा पुरवठा व तालुका पुरवठा अधिकारी, कार्यालयाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पार्किंगचा बोजवारा
परभणी: येथील बसस्थानकावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. अनेक वाहनधारक दुचाकीद्वारे बसस्थानकाकडे येतात; मात्र याठिकाणी एसटी महामंडळ प्रशासनाकडून प्रवाशांच्या दुचाकीसाठी कोणतेही पार्किंग झोन तयार करण्यात आले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी पार्किंगचा बोजवारा उडालेला आहे.
मुळी बंधाऱ्याच्या कामाकडे दुर्लक्ष
गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मुळी येथे उभारलेल्या निम्न पातळी बंधाऱ्याच्या प्रायोगिक तत्त्वावर बसविलेले स्वयंचलित दरवाजे निकामी झाले आहेत. त्यानंतर या बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसविण्याच्या कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या बंधाऱ्याच्या दरवाज्याच्या प्रश्नांकडे अधिकारी, तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.