लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील निजामकालीन इमारतीमध्ये सुरू असलेले मुख्य शस्त्रक्रियागृह स्ट्रॅक्टरच ऑडीटच्या अहवालानुसार दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील पूर्ण शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत.
विदर्भातील भंडारा येथील जळीत प्रकरणानंतर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सतर्क झाले. त्यानंतर रुग्णालय परिसरातील इमारतींचे स्ट्रक्टचर ऑडीत सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयामधील निजामकालीन इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मुख्य शस्त्रक्रिया गृहाची इमारत मोडकळीस आल्यामुळे बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याचबरोबर मुंबई आयुक्तालयातील आरोग्य सेवा संचालक यांनी ८ फेब्रुवारी राेजी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. तेव्हा स्ट्रॅक्चरल ऑडीटमध्ये मुख्य शस्त्रक्रिया गृह बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने ३ मार्च रोजी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून स्त्री रुग्णालयाची इमारत व मुख्य शस्त्रक्रियागृह बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मुख्य शस्त्रक्रिया गृह बंद करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने मागील दोन दिवसांपासून मुख्य शस्त्रक्रिया गृह बंद आहे. त्यामुळे कान, नाक, घसा व पोटाच्या आजारांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. प्रशासकीय उदासीनतेचा फटका रुग्णांना बसत आहे.
परभणीचे पालकमंत्री नवाब मलीक हे केवळ नियोजन बैठकीसाठीच?
कोरेानाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे आरोग्य विभाग सुसज्ज व्हावा, यासाठी केंद्रासह राज्यात सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र दुसरीकडे परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कधी कोरोनाच्या आकडेवारीमध्ये अनियमिता दाखविली जाते. तसेच स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये महिनाभरापासून चार इमारतीसह मुख्य शस्त्रक्रिया गृह बंद करण्याचे आदेश देण्यात येतात. यावर पर्यायी व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून केली जात नाही. रुग्णांचे हाल होत असताना पालकमंत्र्यांचे रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री केवळ नियोजन बैठकीसाच जिल्ह्यात येतात का? असा प्रश्न रुग्ण व नातेवाईकांतून उपस्थित केला जात आहे.
...तर उपलब्ध होईल इमारत
ऑर्थो विभागातील शस्त्रक्रियागृहाचे काम पूर्ण करून हे दोन ऑपरेशन थिअटर सुरू केल्यानंतर सद्यस्थितीत ऑर्थो विभागाच्या होणाऱ्या शस्त्रक्रियेची इमारत उपलब्ध होणार आहे. या इमारतीमध्ये मुख्य शस्त्रक्रियागृह सुरू करता येणार आहे.
सीएस, कलेक्टरचे दुर्लक्ष
रुग्णालय परिसरातील ऑर्थो विभागात कोट्यवधी रुपये खर्च करून दोन अद्ययावत असे शस्त्रक्रिया गृह उभारण्यात आले आहेत. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने वर्षभरानंतरही या दोन ऑपरेशन थिएटरचे काम अर्धवट आहे. त्यामुळे ऑर्थो विभागाच्या शस्त्रक्रिया या जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीच्या समोरील एका इमारतीत सुरू आहेत. आर्थो विभागातील शस्त्रक्रिया गृहाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर आज पर्यायी व्यवस्था म्हणून या इमारतीचा मुख्य शस्त्रक्रिया गृहासाठी करता आला असता, मात्र जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कोणतेही घेणे देणे नसल्याचे दिसून येत नाही.