परभणी : वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता परस्पर आजारी रजेवर गेल्याप्रकरणी कल्याण शाखेतील पोलीस कर्मचारी जगदीश पेंडलवार यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढले आहेत.
जिंतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी जगदीश पेंडलवार यांना पोलीस कल्याण शाखेत नियुक्ती दिली होती. परभणी येथील पोलीस पेट्रोलपंपाच्या आर्थिक व्यवहार व नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. २६ नोव्हेंबर रोजी पेंडलवार यांनी सीक (आजारी) रजेसाठी पोलीस मुख्यालयातील पोलीस निरीक्षकांकडे विनंती केली. मात्र, पोलीस निरीक्षकांनी सीक पास देण्यास नकार दिला.
त्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्यातून परस्पर सीक पास घेऊन आजारपणाचे कारण दाखवून रजेवर गेले. त्याचप्रमाणे पेट्रोलपंपाच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी कोणावरही सोपविली नाही. तसेच कल्याण शाखेच्या पोलीस निरीक्षकांना वैद्यकीय उपचाराची कोणतीही माहिती सादर केली नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी जगदीश पेंडलवार यांच्या निलंबनाचे आदेश १८ डिसेंबर रोजी काढले आहेत.