परभणी : सातत्याने अवर्षणाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणीस्त्रोत उपलब्ध झाल्याने पारंपरिक पिके घेण्याऐवजी आता बागायती पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिला असून, यावर्षी गाळपासाठी येणारे अंतरिम उसाचे क्षेत्र ७ हजार हेक्टरने वाढले आहे.
गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांच्या वास्तव्याने जिल्ह्यातील जमीन सुपीक बनली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी नदी काठचा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जात होता. मात्र सतत अवर्षण परिस्थिती निर्माण होत असल्याने नद्यांमध्ये पाणी शिल्लक राहिले नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर होत गेला आणि बागायती पिकांऐवजी कमी कालावधीत येणाऱ्या आणि जिरायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मागच्या काही वर्षांपासून सोयाबीन, कापूस या पिकांचीच अधिक प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र आता हळूहळू हे चित्र बदलत आहेत.
यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिके बाधित झाली. त्याचबरोबर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये जलसाठा निर्माण झाला असून, भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. एकंदर जिल्ह्यात शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याच पाणीसाठ्याच्या भरवश्यावर आता बागायती पीक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
जिल्ह्यातील ऊस क्षेत्राच्या अहवालावरुन ही बाब आता स्पष्ट होत आहे. २०१८-१९ च्या हंगामात जिल्ह्यात १३ हजार ५८२ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. ती आता यावर्षी २० हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. याचाच अर्थ उपलब्ध पाण्यामुळे ऊस लागवडीचे ७ हजार ६९ हेक्टर क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ अपेक्षित आहे. पुढील वर्षात हे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होणार आहे.
पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिकजिल्ह्यात पाथरी तालुक्यात सर्वाधिक ऊस लागवड झाली आहे. या तालुक्यातून गोदावरी नदी प्रवाहित झाली आहे. त्याचप्रमाणे याच तालुक्यात ढालेगाव, मुदगल, तारुगव्हाण हे तीन बंधारे आहेत. जायकवाडी प्रकल्पाचा कालवाही तालुक्यातून प्रवाहित झालेला आहे. याचा परिणाम ऊस लागवड वाढीत झाला. तालुक्यातील ८ हजार ५९ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र अधिक आहे. जिंतूर तालुक्यात मात्र उसाचे क्षेत्र अत्यल्प राहिले असून, या तालुक्यात सर्वात कमी केवळ ८५ हेक्टर वरील ऊस क्षेत्र गाळपासाठी अंतरिम क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.