परभणी- राज्य शासनाने दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ रुपये कपात केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़
दरवर्षी दुष्काळामुळे शेती पिकातून उत्पन्न होत नसल्याने मागील काही वर्षांपासून शेतकरी दुध व्यवसायाकडे वळला आहे़ त्यामुळे हा व्यवसाय आता शेतक-यांचा मूळ व्यवसाय झाला आहे़ जिल्ह्यामध्ये दुधाचे क्षेत्र वाढत असतानाच महाराष्ट्र शासनाने गायी आणि म्हशीच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला़ सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, दुध उत्पादनाचा खर्च वाढत चालला आहे़ या निर्णयामुळे दुध उत्पादकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे़ तेव्हा हा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाच्या निर्णयाविरूद्ध घोषणाबाजी केली़
या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, रामभाऊ आवरगंड, दिगांबर पवार, मुंजाभाऊ लोडे, राजूश शिंदे, केशव आरमळ, दीपक गरुड, बाळासाहेब ढगे, गजानन गरुड, अंकुशराव शिंदे, आनंदराव पठाडे, माणिकराव रेंगे, संदीप कदम, मुंजाजी कदम, भगवान वाघ, केशव माने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़