पूर्णा तालुक्यातील गोळेगाव येथील शेतकरी संभाजी प्रल्हाद दुधाटे, गोदावरी देवराव गायकवाड, गोविंद तुकाराम दुधाटे या शेतकऱ्यांना विजेची जोडणी दिली नसतानाही महावितरण कंपनीने मागील तीन वर्षांपासून देयके दिली आहेत. याचा जाब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ६ जुलै रोजी परभणी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात दाखल झाले. कनिष्ठ अभियंत्यांनी या प्रश्नावर कोणतीच कारवाई केली नसल्याने अधीक्षक अभियंता यांच्या दालनात बसून भाकरी खात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. काही वेळाने अधीक्षक अभियंता अन्नछत्रे कार्यालयात दाखल झाले. येत्या तीन दिवसात हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, जाफरभाई तरोडेकर, भास्कर खटिंग, गजानन तुरे, रामभाऊ आवरगंड, बाळासाहेब घाटोळ, दिगंबर पवार, उद्धव जवंजाळ, अड संजय शिंदे, मधुकर चोपडे, राम दुधाटे, शिवाजी दुधाटे, तुकाराम दुधाटे, मारुती गायकवाड, विठ्ठल दुधाटे आदींसह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
स्वाभिमानी संघटनेचे महावितरणमध्ये ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:22 AM