परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाची मुदत संपूनही कामाला सुरुवातही झाली नसल्याने संतप्त झालेल्या वांगी येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि.२३) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात जाऊन टेबल- खुर्चीवर आणि कार्यालयात माती टाकून आपला संताप व्यक्त केला.
परभणी तालुक्यातील वांगी या गावापासून वसमत रोडपर्यंत १.८०० मीटर लांबीच्या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. जुलै २०१८ मध्ये या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आले. एक वर्षांच्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित असताना कंत्राटदाराने मुदत संपल्यानंतरही कामाला सुरुवात केली नाही. या प्रश्नी प्रशासनाला निवेदन देऊनही पावले उचलली जात नसल्याने सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह वांगी येथील ग्रामस्थांनी स्टेशन रोड परिसरातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय गाठले. परंतु यावेळी जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे वांगी येथून सोबत आणलेली माती कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीवर आणि कार्यालयात टाकून संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, भास्कर खटिंग, परमेश्वर खनपटे, दिगंबर पवार, केशव निर्मळ, मुंजाभाऊ लोंढे, तुकाराम शिंदे, केशव भोसले, गोविंद दुधाटे, अंगद शिंदे, अच्युत ढगे आदींसह वांगी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.