गंगाखेड: अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पिकविम्याची रक्कम तात्काळ अदा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोमवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील खळी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकर्यांचे सोयाबीन, कापूस, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी, महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत देण्यासंबंधीचे निर्णय तात्काळ घ्यावा, कृषी पंपासाठी विद्युत जोडणी सुरु करावी, कृषीपंपासाठी २४ तास वीज पुरवठा द्यावा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्तारोको आंदोलन केले.
आंदोलनात तालुकाध्यक्ष ज्ञानोबा लंगोटे, भाकपचे ओमकार पवार, पंडित भोसले, रमेशराव पवार, सूर्यकांत बर्वे, अशोक आप्पा गौरशेटे, उत्तमराव पवार, ईश्वर मोरे, गोविंदराव मानवतकर, दिलीप वाघमारे, रामेश्वर आव्हाड, श्रीहरी लंगोटे, भागवत सोळंके, बळीराम रानगिरे, मधुकर सोन्नर, माधव धापसे, रंगनाथ रानगिरे, विजय सोन्नर, बालासाहेब पवार, विनायक सोन्नर आदींसह खळी, दुस्सलगाव, गौंडगाव, रुमना, चिंचटाकळी, महातपुरी, जवळा, सायळा, सुनेगाव आदी गावातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश राठोड, सपोनि बालाजी गायकवाड यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.