तालुक्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूने ८०० कोंबड्या मृत्यू पावल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी या भागात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. या भागातील कुकुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रातील पथकाने मुरुंबा शिवारात पाहणी केली. या पथकात दिल्ली येथील सार्वजनिक आरोग्य सेवेचे सल्लागार डॉ.सुनील खापरडे, औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.रोहितकुमार, विषाणू शास्त्रज्ञ डॉ.मनोहर चौधरी आिण औरंगाबाद येथील डॉ.प्रदीप मुरुंबीकर यांचा समावेश होता. मंगळवारी विविध भागांना भेटी दिल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन पथकातील सदस्यांनी माहिती दिली.
डाॅ.सुनील खापरडे यांनी सांगितले, बर्डफ्लू हा आजार पक्ष्यांमधून माणसांत येण्याचे प्रमाण नगण्य आहे. मात्र हा आजार माणसांत आला तर तो अधिक धोकादायक असतो. त्यामुळे त्यादृष्टीने खबरदारी घेतली का? याची पाहणी करण्याच्या उद्देशाने हा दौरा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने तातडीने केलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत. मात्र आणखी काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हा मुरुंबा परिसरातील १ कि.मी. अंतरापर्यंतचे प्रतिबंधित क्षेत्र आणखी कडक करावे आणि त्याची अंमलबजावणी तीन महिन्यांपर्यंत करण्याच्या सूचना दिल्या असल्याने खापरडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या परिसराच्या १० कि.मी.पर्यंत दररोज सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्लूच्या अनुषंगाने २८ जणांचे स्वॅब नमुने घेतले असून, ते सर्व निगेटिव्ह आहेत. मात्र तरीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे श्वसनाचा त्रास किंवा तापीची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपाचार करावेत, या परिसरात आणखी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे खापरडे यांनी सांगितले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मुरुंबा, कुपटा या भागात प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, मुरुंबा, कुपटा या भागातील सुमारे ४ हजार ५५ कुकुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहेत. प्रशासनाने संपूर्ण ती दक्षता घेतली आहेच. समितीने केलेल्या सूचनेप्रमाणे मुरुंबा येथील प्रतिबंधित क्षेत्र तीन महिन्यापर्यंत वाढविले जाईल, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.लोणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, मनपा आयुक्त देविदास पवार आदींची उपस्थिती होती.
रुग्णालयातही वाढविले बेड
बर्ड फ्लू पक्ष्यांमधून माणसांत येण्याचे प्रमाण कमी असले तरी खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी परभणी येथे जिल्हा रुग्णालयात काही खाटा राखीव ठेवल्या आहेत. तसेच या ठिकाणी व्हेंटीलेटर, ऑक्सिजनची सुविधा केली असल्याची माहिती डाॅ.खोपरडे यांनी दिली.