जिंतूर : वाळू धक्क्यावर कारवाई करण्यास गेलेल्या तलाठ्याचा मृतदेह अखेर २६ मे रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास ३० तासाच्या अथक परिश्रमानंतर छत्रपती संभाजीनगरच्या पाणबुडी पथकाने शोधून काढला. महसूल विभागात या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.
जिंतूर तहसील कार्यालयाचे तलाठी सुभाष होळ व धनंजय सोनवणे हे दोघे तालुक्यातील दिग्रस वाळू धक्क्यावर कारवाई करण्यासाठी २५ मे रोजी सकाळीच पोहोचले. वाळू धक्क्यावर कारवाई करण्यासाठी पोहचलेले असताना पूर्णा नदी पात्रामध्ये सेनगाव तालुक्याच्या हद्दीत वाळू उपसा सुरू असल्याचे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सुभाष होळ यांनी धाडस दाखवत नदीच्या पलिकडील काठावर वाळू धक्क्यावर कारवाई करण्यासाठी जात असताना पूर्णा नदीच्या अर्ध्या पात्रानंतर ते पाण्यात बुडाले. ते पाण्यात नेमके कशामुळे बुडाले हे जरी समजू शकले नसले तरी संबंधिताला पोहताना दम लागला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेनंतर प्रशासनाकडून त्यांच्या मृतदेहाची शोधाशोध सुरु केली. मात्र या मृतदेहाचा शोध लागला नाही. २६ मे रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास सुभाष होळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यास संभाजीनगर येथील पाणबुडी पथकाला यश मिळाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. संबंधिताचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली.
उपविभागीय आधिकारी तळ ठोकूनमहसूल अधिकारी अरुणा संगेवार, जिंतूरचे प्रभारी तहसीलदार परेश चौधरी, सेलूचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर, मंडळ अधिकारी प्रशांत राखे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यासह महसूल विभागाचे सर्व कर्मचारी दोन दिवसापासून घटनास्थळावर तळ ठोकून होते.