परभणी : अवकाळी पावसामुळे शासकीय हमीभाव खरेदी केंद्राने खरेदी केलेल्या सरकी आणि कापूस गाठीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आता तालुकास्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याने राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. खरेदी केलेला कापूस जिनिंग प्रेसिंग परिसरामध्ये साठवून ठेवला असून, मागील दोन आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिनिंगवरील कापूस गाठी आणि सरकी भिजून नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या कापूस गाठी आणि शिल्लक सरकीची नोंद घेण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिल्या आहेत.
या समितीमध्ये तहसीलदार, सहायक निबंधक, बाजार समितीचे सचिव, जिनिंग-प्रेसिंग व्यापारी प्रतिनिधी आणि ग्रेडर यांचा समावेश राहणार आहे. विक्री व उचल झालेल्या सरकीचे पंचनामे केले जाणार असून, शिल्लक असलेली सरकी जागेवरच विक्री करून त्या ठिकाणी नवीन कापूस खरेदी करण्यासाठी जागा उपलब्ध करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मान्सून शेड उभारण्याचे आदेशराज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावयाचा असून, सध्या पावसाचे दिवस लक्षात घेता जिनिंग प्रेसिंग परिसरामध्ये कापूस आणि सरकी साठविण्यासाठी मान्सून शेड उभारण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. आठही तालुक्यांमधील जिनिंग-प्रेसिंगमध्ये दोन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर हे मान्सून शेड उभारावेत. त्यासाठी येणारा खर्च बाजार समितीच्या मार्केट सेसमधून वसूल करावा, असे या आदेशात सूचित केले आहे.