अजय ऊर्फ अशोक प्रभाकर कोल्हाळ असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली. सेलू महसूल विभागाच्या पथकाने २० मे रोजी पिंपरी खुर्द ते शिराळा रस्त्यावर अवैधरित्या १ ब्रास वाळू घेऊन जाणारा व पासिंग नंबर खोडलेला एक ट्रॅक्टर पकडला होता. यावेळी ट्रॅक्टरचालक पथकास पाहून पळून गेला होता. महसूल कर्मचाऱ्यांनी २० मे रोजी ट्रॅक्टर जप्त करून तो सेलू तहसीलच्या प्रांगणात लावला होता. २ जून रोजी सकाळी हा ट्रॅक्टर जागेवर दिसून आला नाही. त्यानंतर ७ जून रोजी तलाठी अविनाश जोगे यांनी सेलू पोलिस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दिली. यावरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर २४ जूनला ‘लोकमत’च्या अंकात ‘चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा पोलिसांना शोध लागेना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढविली. तहसील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये फुटेज तपासणी केली असता त्यामध्ये ४ ते ५ व्यक्ती दिसून आल्या. त्यामधील माहिती आधारे २९ जूनला एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीस पोलिसांनी २९ जूनला सेलू न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
टँकर चोरणाऱ्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:12 AM