परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात जलजीवन मिशन अभियान राबविण्यात आले असून, ६८ हजार कुटुंबीयांना नळजोडणी देत नळाचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. नळ जोडणी देण्याच्या या कामात परभणी जिल्ह्याने मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जल जीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. या अभियानानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेला नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट दिले होते. ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पिण्यायोग्य शुद्ध पाणी नळाद्वारे पुरविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे. २०२०-२१ या वर्षांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत परभणी जिल्ह्याला ग्रामीण भागासाठी ६८ हजार ६०४ नळ जोडणी देण्याचे एवढे उद्दिष्ट निश्चित केले होते. जि.प.ने डिसेंबर महिन्यातच १०० नळ जोडणी देऊन हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
‘हर घर नल से जल’ या योजनेद्वारे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची मोहीम केंद्र शासनामार्फत राबविली जात आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात शासकीय योजनांद्वारे व खासगी बोरवेलद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगामार्फत ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या निधीतून नळ जोडणीची आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली आहेत. वैयक्तिक नळ जोडणीच्या या मोहिमेमध्ये स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. पवार, उपअभियंता गंगाधर यंबडवार, उपअभियंता माथेकर आदींसह गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.