पाथरी: विठ्ठल भिसे
ग्रामपंचायतची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बेबाकी प्रमाणपत्र अनिवार्य असल्याने निवडणूक ग्रामपंचायतींना चांगली ‘पावली’ असून तालुक्यातील १,०५६ उमेदवारांनी आपल्याकडील ग्रामपंचायतचा कर भरणा केल्याने तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची २० लाखांच्या आसपास कर रकमेची ग्रा.पंच्या तिजोरीत भर पडली आहे.
पाथरी तालुक्यात ४२ ग्रामपंचायतींच्या ३७० जागेसाठी सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहेत, यामुळे गावगाड्यात राजकीय वातावरणात चांगलेच तापले आहे. २३ ते ३० डिसेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्जासोबत ग्रामपंचायतच्या विविध कागदपत्रांसोबत उमेदवारी ग्रामपंचायतच्या कोणत्याही कराचा थकबाकीदार नसावा यासाठी बेबाकी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ग्रामपंचायतकडे सर्व उमेदवार यांनी कर भरून बेबाकी प्रमाणपत्र हस्तगत केले आहे.
कर भरणा करण्यासाठी मागील आठ दिवसात ग्रामपंचायत कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. एरवी पाच वर्षे ग्रामपंचायतचा कोणताही कर बहुतेक ग्रामपंचायतमधील नागरिक भरत नसल्याने ग्रामपंचायतच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर कराची वसुली झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जवळपास २० लाख रुपयेपेक्षा अधिक कर वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या गावपातळीवर कुठे महाविकास आघाडी तर कुठे समविचारांची मोट बांधून पॅनल तयार करण्यात आला आहे. कुठे दुरंगी तर, कुठे बहुरंगी लढती होत आहेत. खेरडा ग्रा. पं. बिनविरोध झाली. रेणापूर, बोरगव्हण, अंधापुरी, नाथरा, सारोळा बु. या ग्रामपंचायती अंतिम टप्प्यात बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आमदार बाबाजाणी यांनी पुढाकार घेतला आहे. अखेरच्या दिवसांपर्यंत ३७० जागांसाठी विक्रमी असे १ हजार ५६ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. त्यातील छाननीत ५ अर्ज अवैध झाल्याने १,०५१ उमेदवार वैध ठरले आहेत.
आमची थकबाकी तुम्हीच भरा...
बेबाकी प्रमाणपत्रासाठी दखलपात्र वसुली झाल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक खुद्द ग्रा.पंनाच पावली आहे. असे असले तरी अनेक गावात उमेदवारांनी ‘तुम्हाला उमेदवार हवाय ना, तर माझी बाकी तुम्हीच भरा’ असा कावा केल्याने पुढा-यांना आर्थिक झळ सोसावी लागली आहे.
बाभळगाव ग्रा. पं.ची सर्वाधिक कर वसुली
तालुक्यातील बाभळगाव ग्रा. पं. साठी ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले. या ग्रामपंचायत निवडणूक काळात २ लाख २० हजार रुपयाचा कर वसूल करण्यात आला तर हदगाव बु .ग्रा.पं.चा ४० हजार रुपये, रेणाखळी ३५ हजार रुपये, जैतापूरवाडी ३० हजार रुपये, मरडसगाव ग्रामपंचायतीकडून ३५ हजार रुपयांची कर वसुली झाली आहे. कर वसुलीचे अंतिम आकडेवारी प्रशासनाकडे अद्याप सादर करण्यात आली नाही.
कर वसुलीत
टॉप ५ ग्रामपंचायतीचा कर वसुली
बाभळगाव २२००००/-
वाघाळा ८००००/-
रेणापूर ६८०००/-
बाबूलतार ६२०००
लिंबा ६०५००