परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे पाच महिन्यांपासून बंद असलेले चहा स्टॉल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास प्रशासनाने १७ आॅगस्ट रोजी परवानगी दिली आहे़ त्यामुळे लघु व्यावसायिकांची आर्थिक कोंडी सुटणार आहे़
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या उद्देशाने जिल्ह्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन पुकारण्यात आले़ त्यानंतर जून महिन्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली़ या काळात काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली़ मात्र चहा स्टॉल्स, पानपट्टी, रेस्टाँरंट आणि किचन सुरू करण्यासाठी अद्यापही परवानगी दिलेली नव्हती़ हा व्यवसाय करणारे व्यावसायिक लघु व्यावसायिक मोठ्या संख्येने आहेत़ दररोजच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो़ मात्र प्रशासनाने या व्यवसायांना परवानगी दिली नसल्याने व्यावसायिकांचे कुटूंबिय आर्थिक अडचणीत आले होते़
ही परिस्थिती लक्षात घेवून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चहा स्टॉल्स, पानपट्टी, रेस्टॉरंट आणि किचन सुरू करण्यास सोमवारी परवानगी दिली आहे़ चहा स्टॉल्स चालकांनी परिसरात अस्वच्छता होणार नाही, याची दक्षता घ्यावी, वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे अशा सूचना दिल्या आहेत़ रेस्टाँरंट आणि किचनमधून केवळ पार्सल स्वरुपात विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे़