परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, या मागणीसाठी खा. बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातील व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, कर्मचारी व कंत्राटदारांनी आंदोलनात सहभाग घेतला. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने दुपारी १ वाजेपर्यंत बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
आजच्या आंदोलनाच्या प्रारंभी अन्नुकुमार आणि शाहीर प्रकाश कांबळे यांनी गीत व नाटिका सादर केली. त्यानंतर फुलकळस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सिद्धार्थ मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य सादर केले. यावेळी आ. सुरेश वरपूडकर, आ. डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, सचिन अंबिलवादे, सूर्यकांत हाके, समीर दुधगावकर, जुनेद शेख, राजू शिंदे, दिलीप शृंगारपुतळे, ॲड. राजेश चव्हाण, ॲड. जी. एन. डाखोरे, ॲड. माधुरी क्षीरसागर, डॉ. अनिल कान्हे, प्राचार्य डॉ. के. के. पाटील, प्रा. इंद्रजित भालेराव यांनी मनोगत मांडले.