- सत्यशील धबडगेमानवत (परभणी): शहरातील खंडोबा रोडवरील अतिक्रमण केलेल्या जागेची स्थळ पाहणी आणि पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पथकासोबत वाद घालून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी 17 मार्च रोजी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरपालिका कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राजेश मुरलीधर शर्मा ( रा. रंगार गल्ली, मानवत) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, नगर परिषदेने हरी विठ्ठल करपे यांच्याकडून संपादीत केलेल्या खंडोबा रोड येथील सर्वे नंबर 367 मधील खंडोबा रोडवरील सार्वजनिक शौचालयाची 84 बाय 84 फुट जागेवर अतिक्रमण करुन विना परवाना बांधकाम केले असल्याची तक्रार मुख्याधिकारी कोमल सावरे यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार 17 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजता पालिका कार्यालयातील राजू शर्मा नगररचना सहायक अजय चंद्रकांत उडते, कार्यालयीन अधीक्षक भगवान शिंदे, कनीष्ठ लिपीक मनमोहन बारहाते, नारायण व्यवहारे, संजय कुऱ्हाडे, राजेश भदर्गे, रवींद्र धबडगे यांचे पथक स्थळ पाहणीसाठी गेले.
दरम्यान, पंचनामा करत असताना लक्ष्मण हरिभाउ करपे, सुरेंद्र लक्ष्मण करपे, ओमप्रकाश हरिभाउ करपे, रविंद्र लक्ष्मण करपे यांनी पथकास तुम्ही लोक या ठिकाणी का आलात? तुम्हाला मोजमाप करु देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा? असे म्हणून शिवीगाळ करत तुम्ही येथून गेला नाहीत तर मी इथेच आत्महत्या करीन अशी धमकी दिली. हातातील मोजमाप टेप हिसकावून घेत अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की करून दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी राजू शर्मा यांच्या तक्रारीवरून लक्ष्मण हरिभाउ करपे, सुरेंद्र लक्ष्मण करपे, ओमप्रकाश हरिभाऊ करपे, रविंद्र लक्ष्मण करपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील करत आहेत.