पाथरी येथील तहसीलदार एस. बी. कट्टे यांना ढालेगाव येथून वाहनातून वाळू चोरी होत असल्याची माहिती २७ ऑगस्टला रात्री साडेनऊच्या सुमारास मिळाली. त्यानुसार तहसीलदार कट्टे, रमेश वाघमारे, एन. एस. पवार यांचे पथक शुक्रवारी रात्री दहा वाजता ढालेगावकडे कारवाईसाठी गेले. यावेळी गोदावरी नदीच्या पात्रात वाहनाचा शोध घेताना गावानजीक त्यांना एक पिकअप वाहन त्यांना आढळले. तपासणीत यात वाळू असल्याचे दिसून आले. घटनास्थळी महसूल अधिकारी आल्याचे पाहून वाहन चालकाने माजलगाव भागातून काही लोकांना फोन करून तातडीने बोलावले. त्यानंतर तहसीलदारांनी वाहन ताब्यात घेऊन हलविण्याचा प्रयत्न केला असता येथे दाखल झालेल्या १५ ते २० जणांनी तहसीलदारांना मज्जाव केला. त्यामुळे तहसीलदार कट्टे यांनी पाथरी येथे फोन करून पोलिसांना बोलावले. यावेळी एक पोलीस कर्मचारी साध्या गणवेशात तेथे आला. उपस्थित माफियांनी त्यास दाद दिली नाही. अशाच परिस्थितीत पकडलेल्या वाहनात तहसीलचे कर्मचारी रमेश वाघमारे यांनी स्वतः बसून वाहन घटनास्थळापासून बाहेर काढले. त्यावेळी वाघमारे यांच्यासोबत झटापट होऊन त्यांची चप्पल तुटली. तहसीलदार यांनी पाथरीचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांना फोन करून झालेल्या प्रकारची माहिती दिली. आष्टी फाट्यापर्यंत ताब्यात घेतलेले वाहन आले असता त्या ठिकाणी पुन्हा रोखण्यात आले. रात्री १.३० च्या सुमारास पाथरीहून पोलिसांची जीप आली. यावेळी पोलिसांची जीप पाहून वाळूमाफियांनी धूम ठोकली. त्यानंतर उपस्थित दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेले वाळूचे वाहन पाथरी तहसील कार्यालयात आणले. दरम्यान, जप्त केलेल्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली जाणार असून, हे वाहन ताब्यात घेताना अडविण्याचा प्रयत्न झाला. बीड जिल्ह्यातून राजकीय दबाब आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती तहसीलदार एस. बी. कट्टे यांनी दिली.
अवैध वाळू वाहतुकीवरील कारवाईस तहसीलदारांनाच मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:20 AM