हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिके घेतली आहेत. पेरणी झालेली पिके आता उगवले असून, कवळ्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. याच वेळी पावसाने दगा दिला असून, दहा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे ही कोवळी पिके धरू लागली असून, मुळाजवळील ओलावा कमी होत असल्याने ही पिके कोमजून जात आहेत. अशावेळी कोळपणी करून या पिकांना जगण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र ७७ टक्केहून अधिक पेरणी झालेल्या पिकांना पावसाचे नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे चार दिवसांत पाऊस झाले नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे सांग सांग भोलेनाथ पाऊस कधी पडेल काय असे म्हणत शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
......तर दुबार पेरणी
जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाली असून त्यापाठोपाठ कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने या पिकांना आता पावसाची गरज आहे. मात्र चार दिवसात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर जवळपास ७७ टक्के क्षेत्रावर झालेल्या पेरण्या दुबार करण्याची वेळ जिल्ह्यातील बळीराजा वर येणार आहे.
.......सोयाबीनचा पेरा वाढला
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस पिकाकडे कानाडोळा करत शेतकरी सोयाबीन पिकाची सर्वाधिक पेरणी करत आहेत. या वर्षीही ५ लाख १७ हजार १४२ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ८५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची सर्वाधिक, तर दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी सर्वाधिक सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात असल्याचे दिसून येत आहे.
........देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो
मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कापूस व सोयाबीन ही पिके हातची गेली. आता माझ्या बारा एकरमध्ये उसनवारी करून कापूस व सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र या पिकांना सध्या पावसाची आवश्यकता असताना पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दरवर्षी देव शेतकऱ्यांची का परीक्षा घेतो? असा प्रश्न मनात निर्माण झाला आहे.
- होनाजी बनसोडे
दोन वर्षांपासून नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या करत असताना यावर्षी जून महिन्यातच समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे या पावसाच्या भरोशावर पाच चक्करमध्ये सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ही कवळी पिके करपून जात आहेत. चार दिवसांत पाऊस नाही झाला तर दुबार पेरणी करण्याची वेळ आमच्यावर येणार आहे.
लक्ष्मण वैद्य