पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील कर्मचारी गुरुवारी शहरामध्ये गस्त घालत असताना एक बदामी रंगाचा टेम्पो महावीर टॉकिज परिसरातून जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या टेम्पोमध्ये वाळू भरलेली होती. पथकातील कर्मचाऱ्यांना टेम्पोविषयी संशय आल्याने त्यांनी एमएच २० एए- ९९४८ या क्रमांकाचा टेम्पो थांबविला. मात्र त्याचवेळी टेम्पो चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी दीड लाख रुपयांचा टेम्पो आणि त्यातील सहा हजार रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी जमीरोद्दीन फारुखी यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध वाळू वाहतूक वाढली
जिल्ह्यात अद्यापही वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. असे असताना बाजारपेठेत मात्र वाळू उपलब्ध होत आहे. ही वाळू चढ्यादराने विक्री केली जात असून, वाळूची चोरी करणारे रॅकेट कार्यरत आहे. पोलीस कर्मचारी जिल्हाभरात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत असले तरी या वाहतुकीला अद्याप लगाम बसत नाही. विशेष म्हणजे महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अवैध वाळू माफियांचे फावत आहे.