लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छातीत दुखत असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या होमगार्डचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मयताचे नातेवाईक आणि जिल्हा होमगार्डमधील होमगार्ड कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली. उपचारात हालगर्जीपणा करणाºया डॉक्टराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर या प्रकरणी स्टेशन डायरीला नोंद घेतल्यानंतर हा तणाव निवळला.तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील लखन किसनराव भिसाड (४०) हे होमगार्ड म्हणून सेवेत आहेत. नेहमीप्रमाणे ५ जानेवारी रोजी सकाळी जुना पेडगावरोड भागातील होमगार्डच्या कार्यालय परिसरातील मैदानावर लखन भिसाड यांनी सराव केला. याचवेळी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या छातीत आणि पाठीत दुखू लागले. त्यामुळे दोन सहकाºयांना घेऊन लखन भिसाड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. यावेळी उपस्थित असलेले डॉ.सुनील शिंदे यांनी प्राथमिक उपचार करुन भिसाड यांना घरी जाण्यास सांगितले. लखन भिसाड व इतर दोन सहकारी जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर लखन भिसाड हे जागीच कोसळले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. लखन भिसाड हे वेळेत जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. या ठिकाणी त्यांच्या सर्व तपासण्या करुन योग्य ते उपचार होणे आवश्यक होते; परंतु, जुजबी उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले. डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर केल्याने भिसाड यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपाचे तालुका अध्यक्ष राजेश देशमुख व नातेवाईकांनी केला. काही वेळातच सर्व होमगार्डही रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गाडेकर यांनी होमगार्ड आणि नातेवाईकांची समजूत काढली. घटनेची नोंद नानलपेठ पोलीस ठाण्याच्या डायरीत करण्यात आली. शवविच्छेदन अहवालानंतर रीतसर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.
परभणीत होमगार्डच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 12:44 AM