महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रासाठी तीन ठिकाणी कर्मचारी नियुक्त केले आहेत. शुक्रवारी दुपारी ४ वाजेनंतर शिवाजी चौक येथील केंद्रावर कोणीच आढळले नाही, तर शनिवारी सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान तपासणी करण्यात आल्याचे काही जणांनी सांगितले. मात्र, दुपारी २ वाजेपर्यंतचा अपेक्षित वेळ कोरोना चाचणीसाठी ठेवण्यात आला असतानाही कर्मचारी दिसून आले नाहीत. यावेळी येथे एक पोलीस अधिकारी मात्र बंदोबस्तकामी बसून असल्याचे दिसून आले. सकाळी १० ते दुपारी २ व पुन्हा दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत कोरोना चाचणी करण्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. मात्र, ते येथे दिलेल्या वेळेत दिसून येत नाहीत.
चाचणी वाढविण्याच्या आदेशाकडे कानाडोळा
राज्यात डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका ओळखून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. यातच जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त कोरोना चाचणी करण्याचे आदेश सर्वच विभागांना दिले आहेत. पोलीस आणि आरोग्य विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात या चाचणी अधिक व्हाव्यात, असे सांगितले आहे. मात्र, २ दिवसांपासून परभणी शहरात मात्र चाचणीचे प्रमाण घटल्याचे दिसून आले.