परभणी : अयोध्येत श्रीराम प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त परभणी शहरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यादरम्यान काढलेल्या शोभायात्रेत शहरातील पुढारी सुद्धा सहभागी होते. सोमवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शोभायात्रा आल्याने लोकप्रतिनिधीसह पुढाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपाटत शक्तीप्रदर्शन केल्याचे पुढे आले.
जन्मभूमीवर विराजमान होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी सोमवारी परभणी शहराच्या ग्रामीण भागात भरगच्च भक्तीमय कार्यक्रम झाले. यानिमित्ताने परभणी शहरात सायंकाळच्या सुमारास रामभक्तांकडून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल पाटील, भाजपाचे आनंद भरोसे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सहभागी झाले होते. शोभायात्रेचा आनंद गगनाला भिडला होता.
मात्र त्यातच परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात ही शोभायात्रा आल्यानंतर आपापल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आ. पाटील आणि आनंद भरोसे समोरासमाेर आल्यानंतर त्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थाेपाटत एकमेकांना पाण्यात पाहिले. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही पुढाऱ्यात राजकीय संघर्ष सुरू असून तो शोभायात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला.