परभणी : ठाण्यातील मनपा रुग्णालयात एकाच रात्री १८ रुग्णांचा मृत्यू होतो, हे बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे संबंधित घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी केली. या घटनेत प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि सरकारचे दुर्लक्ष झाल्याने संबंधित रुग्णांना आपला जीव गमावा लागला असा आरोप त्यांनी यावेळी केला.
तीन दिवसापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. परंतु सरकार पातळीवर याबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे पुढे येत आहे. परिणामी यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांसह आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर या घटनेचे नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. आम्ही घरात बसणारे सरकार अन् मंत्री नाही, असे म्हणून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत खासदार जाधव यांनी व्यक्त केले. कोरोना काळात सुद्धा अशी गंभीर स्थिती कधी उद्भवली नाही, महाविकास आघाडी सरकारने सर्व परिस्थिती योग्य रीतीने हाताळून नागरिकांचे जीव वाचवले. परंतु आताचे सरकार हे नागरिकांचे जीव घेणारे ठरत असल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला.---