परभणी : चाळीस वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर विदर्भ-मराठवाड्याला जोडणा-या वझर (बु) गावालगत पूर्णा नदीवरील पूलाच्या कामाचा अखेर श्रीगणेशा झाला. त्यामुळे या भागातील जवळपास ८० गावांना याचा लाभ होणार असून दळणवळणाच्या या माध्यमातून मिळणार आहे. या मार्गाचे काम व्हावे, यासाठी लोकमतच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला होता.
पूर्णा नदीपात्रात सध्या मिक्सर प्लॅन्टची उभारणी सुरू असून बांधकाम साहित्य आले आहे. भले मोठे क्रेन, पोकलॅड मशीनने खड्डे खोदण्याचे काम सध्या करण्यात येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणाअंतर्गत संबंधित काम होत आहे. पाच जिल्ह्यांची सीमा असलेल्या या दुर्गम वझर (बु) गावी होत असलेल्या पूलामुळे जिंतूर लोणी -लोणार हे अंतर ३० किलोमीटरने कमी होईल. वझरपासून समृद्धी महामार्ग अवघा २० किलोमीटर अंतरावर आहे. या पूलामुळे परिसरातील ८० गावे लोणार मेहकर बाजारपेठेची जोडली जाणार असल्यामुळे यामुळे दळणवळण, उद्योग, व्यवसाय वाढीस लागण्यास मदत होणार आहेत.
या कामाचे सर्वप्रथम १९९५ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून परिसरातील ग्रामस्थ आशा लावून बसल्याची स्थिती होती. दरवर्षी उन्हाळ्यात तंत्रज्ञ, अधिकारी येवून खडकांचे नमूने, मोजमाप घेवून जायचे. परिसरातील ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनीधीपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करूनही या कामाला मुहूर्त लागत नव्हता. पण आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने या भागातील अनेक गावांचा याचा लाभ होणार आहे.
दुहेरी रस्त्यालाही मंजूरीजिंतूर तालुक्यातील गणेशपूर ते रिसोड तालुक्यातील लोणीदरम्यान दुहेरी रस्त्याला मंजूरी मिळालेली आहे. वझर येथील पूलाच्या बांधकामामुळे रस्त्याचे काम रखडले होते. लोणी ते वझर व्हाया रायगाव गंधारी या रस्त्याचे काम दृतगतीने सुरू आहे. गणेशपूर ते वझर ३० किलोमीटर रस्त्याचे काम लवकरच सुरू होण्याचे संकेत आहे.