परभणी : व्यंकटेश नगरात मॉर्निंग वॉकहून परत येणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरीने चोरून नेणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या आरोपींना काशीद नगर, भिलारवाडी, कात्रज पुणे येथून अटक केली. तसेच या प्रकरणातील वापरलेली दुचाकी व अन्य मुद्देमाल जप्त केला.
सुरेखा घुगे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण २८ ऑगस्टला सकाळी मॉर्निंग वाकहून परत येताना दोन अनोळखी चोरट्यांनी लांबविले. यात दीड लाखाचे गंठण चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेने पथके तयार केली. पथकाला मिळालेल्या माहितीवरून अमन उर्फ अमन्या किशोर जोगदंड व त्याचा एक सहकारी विधी संघर्ष बालक (दोन्ही रा.विष्णु नगर, नांदेड) यांनी हा गुन्हा केल्याचे समजले. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पि.डी. भारती व पथकाने दोन्ही आरोपींना काशीद नगर, भिलारवाडी, पुणे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे सांगितले. यामध्ये चोरलेल्या सोन्याच्या चैनचा १३.८०० ग्रॅमचा तुकडा, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण एक लाख ९ हजारांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार, बाळासाहेब तुपसुंदरे, राहुल परसोडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, रवीकुमार जाधव, विलास सातपुते, सिद्धेश्वर चाटे, दिलावर खान, परसराम गायकवाड, हनुमान ढगे, निलेश परसोडे, निकाळजे यांनी केली.
तीन गुन्हे उघडकीसआरोपींकडून नवा मोंढा येथील दोन गुन्हे तसेच नांदेड विमानतळचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. मुख्य आरोपी अमन जोगदंड याच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा, दुचाकी चोरी, घरफोडी यासारखे नांदेड जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो रेकॉर्डवरील सर्राइत गुन्हेगार असून त्यास नवा मोंढा पोलिसांच्या ताब्यात दिले.