परभणी: शेतकऱ्यांच्या विविध प्रलबिंत मागण्यांसाठी शनिवारी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या कृषी मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी एकत्र जमा झालेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तांना शनिवारी शहरातील वसमत रस्त्यावरील ‘स्वाभिमानी’च्या जिल्हा कार्यालयातून ताब्यात घेतले. त्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
मागील वर्षाची पिक विमा रक्कम, सध्याच्या सोयाबीन पिक विमाची अग्रीम रक्कम मिळणे, सर्व शेतीमालाची हमीभावाने खरेदी करणे, शेतीला दिवसा वीज पुरवठा, ऊस उत्पादकांची थकीत एफआरपी यासह अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलबित आहेत. मात्र दूसरीकडे राज्याचे कृषीमंत्री त्यांच्या पक्षाच्या शाखा स्थापना करत व हारतुरे स्वीकारत जिल्हाभरातून फिरत आहेत. या सर्व प्रकारचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी १० वाजे दरम्यान परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यालयात कार्यकर्ते जमले. सोबत शेंगा न लागलेले सोयाबिन पिक काहींनी सोबत आणले होते.
मात्र, यांची कुणकुण नवा मोढा पोलीसांना लागली. पोलीसांनी फौजफाट्यासह स्वाभिमानीच्या जिल्हा कार्यालयात दाखल होत कार्यकर्तांना ताब्यात घेतले. त्यानंतर या सर्व कार्यकर्तांना नवा मोंढा पोलीस आणण्यात आले. याप्रकाराने संतप्त झालेल्या कार्यकर्तांनी सरकार विरोधात केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यामध्ये किशोर ढगे, भास्कर खटिंग, मुंजाभाऊ लोडे, रामप्रसाद गमे, दिगंबर पवार,शेख जाफर तरोडेकर, मधुकर चोपडे, ॲड.संजय शिंदे, लक्ष्मण शेरे,बाळासाहेब घाटोळ,केशव आरमळ याच्यासह कार्यकर्तांचा समावेश आहे.