पाथरी (परभणी) : दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेऊन केवळ सलाईनची सुई लावण्यासाठी दवाखान्यात आल्याने संतापलेल्या डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकांसोबत वाद घालत अश्लील शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. वैद्यकीय पेशाला काळिमा फासणाऱ्या या डॉक्टरचे नाव प्रीतम सोमाणी असे आहे. धक्कादायक म्हणजे, उपचारासाठी विनंती करण्यावरून डॉक्टर सोमाणीने पत्रकारांना देखील अश्लील शिवीगाळ केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमठाणा ( ता. माजलगाव) येथील मदन हिराजी भालेराव यांच्या २ वर्षीय नातीचे माजलगाव येथे उपचार सुरु आहेत. तेथील डॉक्टरांनी चिमुकलीवर उपचार करून काही इंजेक्शन तुम्ही गावाकडील डॉक्टरकडे घेऊ शकता असे सांगितले. भालेराव यांची एक मुलगी नर्स असल्याने ती चिमुकलीस हातातील सुईद्वारे इंजेक्शन देत होती. दरम्यान, बुधवारी चिमुकलीच्या हाताची सुई हलली. सुई व्यवस्थित लावून घेण्यासाठी भालेराव हे मुलगी आणि नातीला घेऊन डॉ. प्रीतम सोमाणी यांच्या दवाखान्यात आले. तेव्हा डॉ. सोमाणीने काही चाचण्या करण्यास सांगितले. परंतु, चिमुकलीचे उपचार माजलगाव येथे सुरु आहेत. तुम्ही केवळ सुई व्यवस्थित लावून द्या अशी विनंती भालेराव यांनी केली. यावर संतापलेल्या डॉ. सोमाणीने येथून निघा आणि माजलगाव येथेच उपचार घ्या असे भालेराव यांना सुनावले.
रात्र झाल्याने माजलगाव येथे जाने शक्य नसल्याने भालेराव यांनी पत्रकार असलेल्या नातेवाईकास अडचण सांगितली. तेव्हा पत्रकाराने उपचारासाठी डॉ. सोमाणी यांना विनंती करणारा फोन केला. यावरून पुन्हा डॉ. सोमाणी यांनी संताप व्यक्त करत भालेराव आणि पत्रकारांना अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दरम्यान, बुधवारी रात्री मदन हिराजी भालेराव यांच्या तक्रारीवरून डॉ. प्रीतम सोमाणीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणीरुग्णाचे नातेवाईक आणि पत्रकारांना अश्लील शिवीगाळ केल्याच्या घटनेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने निषेध केला आहे. याप्रकरणी डॉ. प्रीतम सोमाणी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर अध्यक्ष सुधाकर गोंगे, उपाध्यक्ष गजानन घुंबरे, पत्रकार विठ्ठल भिसे, धनंजय देशपांडे, मोहन धारासुरकर, खालेद नाज, सिद्धार्थ वाव्हळे, लक्ष्मण उजगरे, रमेश बिजुले, नागनाथ कदम, सुनील उन्हाळे, विठ्ठल साळवे व एल.आर. कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.