बोरी(परभणी) : शेतात आयोजित केेलेला मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बोरी येथे १५ मे रोजी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सतीश कल्याण चौधरी (२७) असे मृत युवकाचे नाव आहे.
या घटनेनंतर मृत सतीशचे भाऊ गजानन चौधरी यांनी बोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बोरी येथील बाळासाहेब खापरे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील अवधेश ठाकूर यांच्या शेतातील आखाड्यावर १५ मे रोजी मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये ३५ ते ४० जणांचा सहभाग होता. याच ठिकाणी असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने सतीश कल्याण चौधरी हा विहिरीत पडला. काही जणांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर विशाल ईखे यांनी तत्काळ विहिरीमध्ये उडी मारून दोरीच्या सहाय्याने सतीश चौधरी यास काठावर घेतले. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु घटनेनंतर काही जण पार्टी सोडून पळून गेले, असे गजानन चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस निरीक्षक वसंत मुळे, उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, पतंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सतीश चौधरी याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती. त्यानंतर गजानन चौधरी यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब खापरे, अवधेश ठाकूर, संदीप कदम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वसंत मुळे तपास करीत आहेत. सतीश चौधरी यांच्या पार्थिवावर १६ मे रोजी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश चौधरी यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान चौधरी यांचे ते पुतणे होत.