परभणी : शहर महापालिकेच्या विद्युतपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सोहेल सिद्दिकी यांना मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी कर्तव्यात कसूर केल्याने हे आदेश काढण्यात आल्याचे पत्रात नमूद केली आहे. यासह विविध बाबींचा ठपका सोहेल सिद्दिकी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रविवारी झालेल्या राजगोपालाचारी उद्यानातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर पार पडलेल्या १५० उंचीच्या ध्वजस्तंभाच्या उद्घाटनवेळी अचानक वीजपुरवठा गुल झाला. याचदरम्यान मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला विलंब झाला.
अचानक वीजपुरवठा खंडित का झाला किंवा यामध्ये महापालिकेची अथवा महावितरण या दोन्हीपैकी कोणत्या विभागाची तांत्रिक चूक होती. तसेच त्यात कोण दोषी आहे, याची अद्याप माहिती समोर आली नसली तरी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी तडकाफडकी आदेश काढून कनिष्ठ अभियंता सोहेल सिद्दिकी यांना निलंबित केले आहे.