परभणी : विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर परीक्षार्थींची हजेरी घेऊन प्रवेशपत्र व ओळखपत्र तपासणी करताना एका परीक्षार्थीच्या हजेरीपटावरील सही आणि प्रवेश पत्रावरील सहीमध्ये तफावत असल्याचे पर्यवेक्षकांना आढळले. हा प्रकार शुक्रवारी शहरातील शारदा महाविद्यालयाच्या एका हॉलमध्ये उघडकीस आला. यावरून तोतया परीक्षार्थी याची चौकशी केली असता त्याने अन्य एका परिक्षर्थीचा जागेवर बसून परीक्षा देण्याचा प्रयत्न करताना मिळून आला. त्यावरून दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
शारदा महाविद्यालयातील प्रा.दत्ता चामले यांनी नानलपेठ ठाण्यात फिर्याद दिली. शारदा महाविद्यालयात विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्याने त्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली होती. शुक्रवारी सकाळी दहा वाजता ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर ते हॉल क्रमांक २२ मध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्तीवर होते. यामध्ये उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर परीक्षार्थींची हजेरी घेऊन प्रवेशपत्र, ओळखपत्र तपासणी करताना एका परीक्षार्थीने हजेरी पटावर त्याचे आसन क्रमांक आणि सही केल्यानंतर पाहणी केली असता त्याच्या दोन्ही सहीमध्ये तफावत असल्याचे आढळले.
या उमेदवाराकडे ओळखपत्र तपासणीस मागितले असता त्याच्याजवळ प्रवेश पत्र होते, ओळखपत्र नसल्याचे सांगून जाऊन आणतो असे म्हणून तो परीक्षा हॉलच्या बाहेर जाताना त्याची पुन्हा विचारपूस केली. त्याने त्याचे नाव पठाण सोहेल खान हिदायत खान असे सांगितले. चैतन्य त्र्यंबकराव पवार याची मी परीक्षा देत असून आम्ही दोघेही ज्ञानोपासक महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचेही त्याने सांगितले. यावरून केंद्रप्रमुख सुनील बल्लाळ व प्रभारी प्राचार्य शामसुंदर वाघमारे यांना माहिती दिली. तसेच चौकशी केली असता सदर आसन क्रमांक (डीए १०००६७) हा चैतन्य त्र्यंबकराव पवार याचा असून त्याच्या आसन क्रमांकावर तोतया परीक्षार्थी म्हणून पठाण सोहेल खान हिदायत खान हा परीक्षा देताना आढळला.
संगनमत करुन खोटे प्रवेशपत्र तयार केलेया दोघांनी संगणमत करून प्रवेश पत्रावरील फोटो बदलून बनावट सही करून खोटे बनावट प्रवेशपत्र तयार करून फसवणूक केली. परीक्षा केंद्रात प्रवेश करून हजेरी पटावर बनावट सही करून फसवणूक करून परीक्षा देताना मिळून आल्याने नमूद दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक माधव ईजळकर तपास करीत आहेत.