परभणी : टेलरिंगच्या दुकानात बसलेल्या महिलेस एका आरोपीने तेथे जाऊन मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील मारहाण करणाऱ्या आरोपीस जिंतूर न्यायालयाने शनिवारी तीन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच एक हजार रुपये दंड आणि हा दंड न भरल्यास सहा दिवस साधा कारावास अशी शिक्षा दिली आहे.
याबाबत माहिती अशी, फिर्यादी महिला या त्यांच्या टेलरिंगच्या दुकानात बसल्या असताना आरोपीने तेथे जाऊन फिर्यादीच्या केसांना धरून मारहाण केली होती. या घटनेत बामणी पोलीस ठाण्यात सहा जुलै २०१४ ला गुन्हा दाखल झाला होता. सदरील गुन्ह्याच्या तपास पोलीस अंमलदार एस.यु.पुरी यांनी केला होता. यामध्ये आरोपीविरुद्ध सबळ पुरावे जमा करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
जिंतूर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर.पनाड यांनी पुराव्याचे अवलोकन करून शनिवारी या प्रकरणात आरोपी आसाराम केशव खूपसे (५०, रा.सावंगी भांबळे) यास दोषी ठरवून तीन महिने साधा कारावास व एक हजार रुपये दंड आणि हा दंड न भरल्यास सहा दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलिस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, सुरेश चव्हाण, सय्यद अकबर यांनी काम पाहिले. सरकारी अभियोक्ता सवणे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.