पाथरी ( परभणी ) : तोडणी तारीख होऊन ही ऊस गाळपास जात नसल्याने पाथरी येथील रेणुका सुगर्स साखर कारखान्याच्या गेटसमोर शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यास वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
इटाळी (ता. मानवत ) येथील शेतकरी पांडुरंग विठ्ठलराव घुले यांच्या अडीच एकर उसाची नोंद पाथरी येथील रेणुका शुगर्स साखर कारखान्याकडे केली आहे. मात्र, नोंद असूनही ऊस गाळपास गेला नाही. कारखान्याकडे खेटे मारूनही ऊस शेतात उभा असल्याने नुकसान होत आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांने सकाळी 10 .30 वाजेच्या सुमारास रेणुका सुगर्सच्या बाहेर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
कारखान्याच्या गेटवरील कर्मचाऱ्यांनी वेळीच घुले यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रदीप हिरक यांच्या फिर्यादीवरून शेतकऱ्याविरुद्ध कलम 309 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.