देवगावफाटा (परभणी) : तालुक्यात आज दुपारी २:४५ वाजेच्या सुमारास सुसाट वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. पाऊस काही काळच पडला मात्र यादरम्यानच तालुक्यात ४ ठिकाणी वीज कोसळली. यात २ बैल, १ गाय दगावले तर १ हजार कडबा पेंड जळून खाक झाले. मृग नक्षत्रातील पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
आज दुपारी वीजेच्या कडकडाटासह तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. अल्पकाळ झालेल्या या पावसात चार ठिकाणी वीज कोसळल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाले. रवळगाव येथे रमेश रोगडे यांची बैलजोडी बांधलेल्या झाडावर वीज कोसळली. यामध्ये एक बैल ठार झाला. दुसऱ्या घटनेत खादगाव येथील परमेश्वर भाबड यांचा बैल अंगावर वीज कोसळल्याने दगावला.
तर तिसऱ्या घटनेत माळसापूर येथे शेतातील गंजीवर वीज कोसळून १ हजार कडबा पेंड जळून खाक झाली. चौथ्या घटनेत डिग्रस ( खु. ) येथे विज पडून दत्तात्रय नानाभाऊ शेरे यांची गाय दगावली. खरीप पेरणीच्या पूर्वसंध्येला वीज कोसळून २ बैल, १ गाय आणि जवळपास २ लाख रुपयांचा कडबा जळून खाक झाला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच सेलू शहरातील उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांच्या बसस्थानक परिसरातील शासकीय निवासस्थानमधील लिंबाचे झाड देखील उन्मळून पडले आहे. याशिवाय अनेक ठिकाणी फळबाग, भाजीपाला शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी महसूल विभागास दिली आहे. तलाठ्यांना पंचनामा करण्याबाबत सूचना दिल्या असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.