जिंतूर (जि. परभणी) : तालुक्यातील गणेशनगर तांडा परिसरातील वाळू धक्क्यावर शासनाची कोणतीही परवानगी न घेता चक्क पूर्णा नदीवर पूल बांधण्यात आला. या पुलावरून लाखो रुपयांची वाळू माफियांनी चोरून नेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता या भागातील वाळूची ईटीएसद्वारे मोजणी करून या भागातील वाळूमाफियांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.
तालुका प्रशासनाने मंगळवारी गणेशनगर तांड्याजवळील वाळू धक्क्यावर कारवाई करीत बोट व पोकलेन मशीन जप्त केली. या कारवाईनंतर या भागातून किती वाळू चोरून नेली, याचा कयास बांधता येतो. या भागात असणाऱ्या पूर्णा नदीपात्रामध्ये पाणी असतानाही संबंधित वाळूमाफियांनी या ठिकाणी पूल उभारला. पूर्णा नदीच्या दोन्हीकडील पाण्याचा प्रवाह अडवून बांधण्यात आलेल्या या पुलाला पाटबंधारे विभागाची कोणतीही परवानगी नाही.
जिंतूर तालुक्यातून निघणारा हा पूल चक्क सेनगाव तालुक्यात पोहोचतो. परभणी जिल्ह्याच्या प्रशासनाने कारवाई करण्याचे ठरविल्यास या धक्क्यावरील सर्व वाहने या पुलावरील रस्त्यावरून सेनगाव हद्दीत नेली जातात. हिंगोली जिल्ह्यातील प्रशासनाने कारवाई करण्याचे ठरविल्यास या भागात असणारी वाहने या पुलाच्या माध्यमातून चक्क परभणी जिल्ह्यात आणण्यात येतात. परिणामी, महसूल प्रशासनाने कारवाई करण्यास अडथळे निर्माण केले जात होते, नव्हे तर हा पूल प्रशासनाला हायजॅक करण्यासाठी बांधण्यात आल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकरणात आता पूर्णा नदीपात्रातून उत्खनन केलेल्या वाळूचे मोजमाप करून जबाबदारी निश्चित करण्याचे काम महसूल विभागाला करावे लागणार आहे.
...हा घ्या पुरावातालुका महसूल प्रशासनाने गणेशनगर तांडा येथील धक्क्यावर कारवाई केली असली, तरी चक्क एका बहाद्दराने आपला हायवा जिंतूर हद्दीतून सेनगाव हद्दीत नेऊन उभा केला. हा हायवा आपल्या हद्दीत नसल्याने कारवाई करता येणार नाही, अशी महसूल प्रशासनाने भूमिका घेतली. परिणामी, वाळू चोर असूनही हद्दीच्या मर्यादेमुळे संबंधित हायवाला जीवदान मिळाले आहे. अशाच प्रकारे प्रत्येक वेळी कारवाईच्या दरम्यान पूर्णा नदीवरील पुलाचा उपयोग करून वाहने इतर तालुक्याच्या ठिकाणी उभी केली जात आहेत. महसूल प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.