परभणी : केबीसी कंपनीविरुद्ध दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीस परभणीच्या सीआयडी विभागाच्या पथकाने नाशिक येथे आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकून गुरुवारी ताब्यात घेतले आहे. या आरोपीस परभणी जिल्हा विशेष व सत्र न्यायालयासमोर शनिवारी हजर केले असता त्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बापूसाहेब छबु चव्हाण (५३ रा.समर्थ नगर, आडगाव शिवार, पंचवटी, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, परभणी शहरातील नवा मोंढा ठाण्यात २५ नोव्हेंबर २०११ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये आरोपींनी संगणमत करून केबीसी मल्टी ट्रेड प्रा.लि.कंपनी नाशिकच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणुकीच्या विविध योजना लोकांना सांगून तसेच गुंतविलेली रक्कम कमी कालावधीत दाम दुप्पट करून देण्याचे आमीष दाखवून फिर्यादी व इतर लोकांकडून पैसे ठेवी स्वरूपात स्वीकारून खोटी प्रमाणपत्र दिली व मुदतीनंतर पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. यामध्ये एकूण १९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजी नगर, पुणे यांच्यावतीने परभणी विभागाने तपास करून केबीसीचे संचालक, मुख्य प्रवर्तक भाऊसाहेब छबु चव्हाण यास २२ ऑगस्ट २०२३ मध्ये अटक केली असून या आरोपीस जिल्हा कारागृहात जेरबंद करण्यात आलेले आहे. या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी.एन.बुरसे, पोलीस कर्मचारी पी.एस.नाईक, कुरेशी, जे.जी.ढाले, एस.आर.चाटे यांनी १२ ऑक्टोबरला बापूसाहेब छबु चव्हाण (५३, रा.समर्थ नगर, आडगाव शिवार, पंचवटी, नाशिक) याच्याबाबत माहिती मिळाल्याने सदरील ठिकाणाहून छापा टाकून त्यास ताब्यात घेतले.
यामध्ये स्थानिक पोलिसांनी सुद्धा राज्य गुन्हे अन्वेषण विभागास मदत केली. या प्रकरणात आडगाव पोलीस स्टेशन येथे नोंद करून आरोपीस परभणी येथे आणण्यात आले. त्यानंतर बापूसाहेब छबु चव्हाण यास १४ ऑक्टोबरला विशेष व जिल्हा सत्र न्यायालय-२ येथे न्यायाधीश शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक बी.एन.बुरसे तपास करीत आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.