मानवत: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानवत शहरातील खंडोबारोड परिसरात धाड टाकून भारतीय चलनातील 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई आज दुपारी साडेचार वाजता करण्यात आली. विलास संतोष खरात असे तरुणाचे अनव असून त्याच्या घरातून कलर झेरॉक्स मशीन आणि हजारो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
शहरातील खंडोबा रोड परिसरात विलास संतोष खरात याची छोटी किराणा माल विक्रीची टपरी आहे. विलास आपल्या घरात बनावट नोटा तयार करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून पोलीस अधीक्षक रागसुद्धा आर, अप्पर पोलीस अधिक्षक वसंत काळे, स्था गु शाखेचे पोलीस निरिक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनखाली पोउनि नागनाथ तुकडे साईनाथ पुय्यड, पोलीस अंमलदार रवि जाधव, विलास सातपुते, बाळासाहेब तुपसमुंद्रे, हरिभाऊ खुपसे, दिलावर खान, मधुकर ढवळे, चालक निकाळजे यांचे पथक आज दुपारी 4:30 वाजता खंडोबा रोड परिसरात धडकले.
विलास खरातच्या घरी छापा टाकला असता पोलिसांना तेथे भारतीय चलनातील 200 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. अधिक तपासात कलर झेरॉक्स मशीन, कागद, वाटर मार्क आदी साहित्य आढळून आले. या प्रकारणी संतोष खरात याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.